Breaking News

तलावांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबल्याचा परिणाम... नवी मुंबई परिसरातील प्रमुख तलावांकडे फ्लेमिंगोंची पाठ !

तलावांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबल्याचा परिणाम... नवी मुंबई परिसरातील प्रमुख तलावांकडे फ्लेमिंगोंची पाठ !

नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराची फ्लेमिंगो सिटी म्हणूनही ओळख आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नवी मुंबईला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्यामुळे शहराच्या खाडी परिसरात दर वर्षी फ्लेमिंगों अर्थात परदेशी पाहुण्यांचे आगमन होत असते आणि त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी होते. विशेषकरून पामबीच रोडवर टी. एस. चाणक्य हा खाडी परिसर फ्लेमिंगोंचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जाते. मात्र यंदा फ्लोमिंगोचे नवी मुंबईत आगमन झाले असले तरी ह्या फ्लेमिंगो अर्थात परदेशी पाहुण्यांनी नेरुळमधील डीपीएस, एनआरआय आणि टी.एस. चाणक्य या तीन महत्त्वाच्या वेटलँड्सकडे पाठ फिरविली असल्याच दिसून येते. दरम्यान, सदरचे हे फ्लेमिंगो या वेटलँडसकडे न उतरता पुढे जात असल्याने पर्यावरणप्रेमींनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तलावांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते.

या जलस्रोतांचे पाणी विषारी झाल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. मंगळवार आणि बुधवारी पक्षी निरीक्षकांनी डीपीएस तलावावरून फ्लेमिंगोंचे थवे उडताना पाहिले, मात्र ते खाली उतरले नाहीत. कार्यकर्त्यांच्या मते, हे पक्षी पूर्वी अन्नासाठी महत्त्वाच्या असलेल्या या ठिकाणांचे निरीक्षण करून टाळत आहेत. हे तलाव ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे उप-वेटलँड्स आहेत. नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांत परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले. टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स १७,००० ते २३,००० एमजी/एल इतके आढळले, जे साधारण ५,००० एमजी / एल या सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. पीएच ९ पेक्षा जास्त असून क्षारीय ताण दर्शवतो. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड १४.८ - २३.६ एमजी / एल (सुरक्षित ३ - ५ एमजी / एल) आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड ४७.५-७३.५ एमजी/ एल आढळून रासायनिक प्रदूषण स्पष्ट झाले. यावरून हे सर्व निर्देशांक एकच गोष्ट सांगतात की, उपरोक्त वेटलँडमध्ये पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी नमूद करतांना सांगितले. पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या मते, भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी येते, पण ओहोटीच्या वेळी प्रदूषित पाणी बाहेर जात नाही. उंचावलेल्या नाल्यांमुळे पाणी साचते आणि शेवाळ वाढते. दरम्यान, वनविभागाने ऑपरेशन डीपीएस फ्लेमिंगो लेक क्लीनअप सुरू करून दररोज ५००-६०० किलो शेवाळ काढण्याचे काम सुरू केले असून आतापर्यंत २.५ टनांहून अधिक कचरा हटवला आहे. पर्यावरणवाद्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असले तरी तो फक्त तात्पुरता उपाय असल्याचे म्हटले आहे. ही चांगली सुरुवात आहे, पण अजून खूप काम बाकी आहे, असे कुमार यांनी सांगत, निचरा मार्ग खाली करून भरती-ओहोटीचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. रेखा संखाला (सेव्ह मँग्रोव्हस अँड फ्लेमिंगोज फोरम) आणि संदीप सरीन ( एनएमईपीएस) यांसह कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण निरीक्षण व दीर्घकालीन पुनर्संचयितीकरणाची मागणी केली आहे. एकंदरीत या परिस्थितीसाठी प्रशासनाच्या दुर्लक्षालाही जबाबदार धरत, एनजीटीच्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे. तलावांच्या संरक्षणासाठी शासकीय हस्तक्षेपाची मागणी एकंदरीत या बाबी लक्षात घेता, पूरनियंत्रण, भूजल पुनर्भरण आणि जैवविविधतेसाठी महत्त्वाच्या या वेटलँड्सच्या संरक्षणासाठी तातडीने सरकारी हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. एकदा हे नष्ट झाले, तर आपल्या आयुष्यात ते पुन्हा निर्माण होणार नाहीत, असा गंभीर इशारा संखाला यांनी यासंदर्भात बोलतांना दिला आहे.


Most Popular News of this Week

तलावांमधील पाण्याचा...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या...

सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा...

| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... |...

नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४...

... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत...

उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा...

उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची...

भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) –...