Breaking News

सुनियोजीत शहरात पार्किंग व्यवस्थेचा उडाला बोजवारा !

सुनियोजीत शहरात पार्किंग व्यवस्थेचा उडाला बोजवारा !

रस्त्यावरील दुहेरी वाहन पार्किंग देते अपघातांना निमंत्रण नवी मुंबई – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराचा नियोजीत शहर म्हणूनही उल्लेख केला जातो. मात्र आजमितीस शहराच्या विविध भागातील रस्त्यांलगत दुहेरी वाहन पार्किंग होण्यासह विशेषकरून नागरिकांच्या हक्काच्या फुटपाथवरही बेशिस्तपणे वाहन पार्किंग होत असल्याने नवी मुंबई शहरात पार्किंग व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. गंभीर बाब म्हणजे रस्त्यालगत होणारी वाहन पार्किंग आता अपघाती घटनांना निमंत्रण देत असल्याचे घणसोलीत बेस्ट बस आणि क्राइस्ट अकॅडमीच्या खासगी शाळेच्या बसमध्ये नुकत्याच झालेल्या अपघाती घटनेवरून समोर आले आहे. एकंदरीत या परिस्थितीमुळे शहराला लागलेले नियोजीत शहर हे विशेषण पुसण्याचे काम यानिमित्ताने होतांना दिसत असून, या परिस्थितीकडे वेळीच लक्ष न दिल्यास शहराचा विचका होण्यास वेळ लागणार नाही अशा प्रतिक्रिया जनमानसातून यानिमित्ताने ऐकावयास मिळत आहे. एकेकाळी प्रशस्त असे दिसणारे नवी मुंबईतील रस्ते आता वाहनांच्या रस्त्यांवरील वाढत्या बेशिस्त दुहेरी पार्किंगच्या समस्येमुळे अरूंद झाले आहेत. रस्ते सोडाच शहरातील फुटपाथवरही वाहने पार्क होत आहेत. विशेषकरून काही ठिकाणी तर गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाहन पार्क करण्यासाठी जागा शिल्लक असतांनाही सोसायटी आवारात जागा शिल्लक राहावी म्हणून जाणूनबुजून रस्त्यावर वाहन पार्क करण्याचे प्रकार होतांना दिसत आहे. पामबीच मोराज सर्कलजवळ झुडीओ स्टुडिओसमोरुन मोराज चौकात जोडणारा करोडो रुपयांचा प्रशस्त रस्ता उद्घाटनाआधीच अवैध पार्किंगच्या विळख्यात अडकला आहे. हीच परिस्थीती या भागातील मार्केटभोवती झाली आहे. नवी मुंबईच्या सर्वच भागात या प्रकारांनी अक्षरश: कळस गाठला असल्याने रस्त्यांलगत वाहनांची जत्रा भरल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत असून, वाहन पार्किंगची ही समस्या दिवसेंदिवस अधिकच जटिल होत चालली आहे. यावरून पार्किंगची ही समस्या सोडवण्याविषयी वाहतूक पोलिस, महापालिका व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अशा सर्वच यंत्रणा उदासीन आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याबाबत उपरोक्त यंत्रणांकडून होणाऱ्या बैठकांमधून फक्त चर्चा करण्यासह कागदी घोडे नाचविले जात असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी होतांना दिसत नाही. एखादा मंत्री व व्हिआयपी व्यक्ती शहरात येणार असेल तेव्हा मात्र झाडून सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे पहावयास मिळते. रस्ते तर सोडाच नागरिकांच्या हक्काचे फुटपाथही आता नागरिकांसाठी न राहता, वाहन पार्किंगसाठी बनविले आहेत की काय असे चित्र शहरात फेरफटका मारल्यास पहावयास मिळते. शहराची वाढती लोकसंख्या आणि एका एका घरात दोन पेक्षा अधिक वाहने अशा एकंदरीत समीकरणांमुळे उदंड जाहली वाहने पार्किंगसाठी जागा मिळेना अशा बजबजपुरीकडे सध्या शहराची वाटचाल होतांना दिसत आहे. या वाहनांमुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषणाची समस्या हाताबाहेर चालली आहे. संबंधित यंत्रणांच्या बेजबाबदार धोरणामुळे व प्रशासनाच्या अनास्थेमुळे सार्वजनिक ठिकाणच्या पार्किंगचा बट्ट्याबोळ उडाला आहे. काही अपवाद सोडले, तर शहरात सुनियोजित पार्किंग आता कुठेच दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्यासह आता अपघाती घटनाही होवू लागल्या आहेत. घणसोलीत घडला अपघात हे त्यांचे ज्वलंत उदाहरण आहे. शहरात मंगल कार्यालये, सभागृहे अशा ठिकाणी पार्किंगची सोय असायला हवी. परंतु आजही बहुतांश हॉटेल व मंगल कार्यालयांना पुरेसे पार्किंगच नाही. वाशी शहराचे प्राईम लोकेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी से-१७ येथील रत्नाने ओळखल्या जाणाऱ्या एका हॉटेलसमोर तसेच पूर्वीच्या अपना बाजार व आताच्या तनिष्क ज्वेलर्ससमोरील रोडवर तसेच शहराच्या विविध भागातील हॉटेलसमोर दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. भविष्यात ही समस्या अधिक गंभीर बनणार आहे. एकंदरीत नवी मुंबई शहरात निर्माण होत असलेली परिस्थिती पाहता यंत्रणांनी, लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष पुरवून आवश्यक त्या उपाय योजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घणसोलीतील घटना भविष्यातील मोठ्या अपघाताची नांदी.... घणसोलीत दुहेरी वाहनपार्किंगमुळे अरूंद झालेल्या रस्त्यामुळे बेस्टची बस व खाजगी शाळेची बसमध्ये झालेल्या या घटनेत सुदैवाने क्राइस्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह बेस्ट बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले असले तरी सदरची ही घटना भविष्यातील मोठ्या अपघाताची नांदी ठरू शकते अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सदरची ही बाब लक्षात घेता, वेळीच या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह इतर संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


Most Popular News of this Week

तलावांमधील पाण्याचा...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या...

सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा...

| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... |...

नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४...

... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत...

उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा...

उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची...

भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) –...