सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर
| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... | एप्रिल २०२६ अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडको महामंडळाने सन २०२६ - २७ या आर्थिक वर्षासाठी रु.१६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून नवी मुंबई तसेच परिसरातील नियोजित शहरी विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा विस्तार, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी बळकटीकरण आणि गृहनिर्माण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महत्वाचा प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या दररोज ७६ शहरांसोबत सुमारे १५० विमानांद्वारे (एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स) वाहतूक सुरू असून सुमारे १९,००० प्रवाशांची दररोज वाहतूक होत आहे. एप्रिल २०२६ अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना सिडकोने रु.९,७७४२३ कोटींचे सुधारित उत्पन्न आणि रु.९,७७०.२६ कोटींचा खर्च नोंदवला असून रु. ३.९७ कोटींचा अधिशेष साध्य केला आहे. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करतानाही आर्थिक शिस्त राखल्याचे यावरून स्पष्ट होते. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रु. १६,२५० कोटींचे उत्पन्न आणि रु. १६,१५० कोटींचा खर्च अपेक्षित असून रु.१०० कोटींचा अधिशेष अपेक्षित आहे. सन २०२६-२७ साठीचा सिडकोचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, दळणवळण आणि दर्जेदार गृहनिर्माणाबाबतच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरोसिटीचा विकास तसेच प्रस्तावित एज्यु सिटी आणि मेडिसिटी, यासोबत मेट्रो लाईन ८ व लाईन २ द्वारे वाढलेले दळणवळण, तसेच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि इतर धोरणात्मक विकास उपक्रमांच्या जोरावर नवी मुंबई एक प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज असल्याचा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे. वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण कामगिरी पाहता, गतवर्षातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यान्वयन होय. या विमानतळाचे उदघाटन दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असून, दि. २५ डिसेंबर २०२५ पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. सध्या दररोज ७६ शहरांसोबत सुमारे १५० विमानांद्वारे (एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स) वाहतूक सुरू असून सुमारे १९,००० प्रवाशांची दररोज वाहतूक होत आहे. एप्रिल २०२६ अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवासी आणि ०.५ दशलक्ष टन मालवाहतुकीची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. ३,७०० मीटर लांबीची धावपट्टी मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी सक्षम आहे. पुढील टप्प्यात टर्मिनल-२, सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स, मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि जनरल एव्हिएशन टर्मिनल उभारण्याची योजना असून वॉटर टॅक्सी सेवा आणि फेडएक्स कार्गो हब सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. प्रमुख पायाभूत सुविधा व कनेक्टिव्हिटी प्रकल्प (सन २०२५ - २६ मध्ये कामाचा प्रारंभ झालेले प्रकल्प ) मेट्रो लाईन ८ (सीएसएमआयए-- एनएमआयओ): छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारी ३४.८९ किमी लांबीची मेट्रो लाईन ८ विकसित करण्यात येत असून त्यामध्ये २० स्थानके असतील. २०३१ पर्यंत या मार्गावर दररोज सुमारे ९.८ लाख प्रवाशांची वाहतूक अपेक्षित आहे. सिडकोने मेट्रो लाईन १ए (बेलापूर-एनएमआयए, ३.२ किमी) आणि मेट्रो लाईन २ (पेंढार - एनएमआयए टर्मिनल- ४, १५ किमी) या मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून त्यामुळे नवी मुंबई मेट्रो नेटवर्क विमानतळाशी जोडले जाणार आहे. सिडकोकडून नवी मुंबईमध्ये सुमारे २०,००० आसन क्षमतेचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्याधुनिक इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरेना विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक निविदा प्राप्त झाल्या आहेत व अंमलबजावणीच्या पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचा ९ होलवरून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ होलच्या चॅम्पियनशिप गोल्फ कोर्समध्ये विस्तार करण्यात आला आहे. येथे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया - सिडको ओपन २०२५ स्पर्धा आयोजित केली होती. नवी मुंबईमध्ये वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रादेशिक हस्तकला, संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी युनिटी मॉल विकसित करण्यात येत आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई विमानतळाभोवती विशेष आर्थिक जिल्ह्यांच्या माध्यमातून आयकॉनिक सिटी डेव्हलपमेन्ट धोरण राबविण्यात येत आहे. सुमारे २७० हेक्टर क्षेत्रात एरोसिटी विकसित करण्यात येणार आहे. यात करंजाडे परिसरात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात विकसित होणाऱ्या एड्युसिटीमध्ये १० पर्यंत जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना स्थान देण्याची योजना आहे. यासह सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित मेडिसिटीमध्ये अत्याधुनिक रुग्णालये, क्रीडा वैद्यक केंद्रे, संशोधन सुविधा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान अधोसंरचना विकसित करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर या प्रकल्पाच्या कामांना वेग आला असून, रस्ते तसेच आयकॉनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीत उल्लेखनीय प्रगती सुरू आहे. खारघर येथे १५५ हेक्टर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क तसेच जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान ५६० हेक्टर क्षेत्रात इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. खारघर येथे प्रस्तावित आफ्रिका-भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र हा जागतिक दर्जाच्या व्यवसाय, प्रदर्शन आणि सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून भारत-आफ्रिका आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी राबविण्यात येणारा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. सिडकोकडून नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र सुमारे २२५ चौ. किमी क्षेत्रात विकसित करण्यात येत असून भविष्यातील शहरी विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी जलसुरक्षेसाठी प्रकल्प: कोंढाणे धरण - ३५० एमएलडी, हेटवणे धरण - १५० ते २७० एमएलडी, बालगंगा धरण - ३५० एमएलडी यांचा समावेश असून कोंढाणे धरण जलावर्धन वितरण व्यवस्था प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महामंडळाने १६,८७६ सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती, ज्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यशाच्या पायावर पुढे जात, सन २०२६ - २७ मध्ये सुमारे १९,३०० सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना सिडकोकडून राबविण्याचे नियोजन आहे. ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास कालावधी ९० मिनिटांवरून ३० मिनिटांपर्यत सिडकोकडून ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान २५.३ किमी लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. रु. ६,५२१ कोटींच्या अंदाजित खर्चाचा हा प्रकल्प पीपीपी मॉडेलअंतर्गत राबविण्यात येत असून त्यामुळे ठाणे ते विमानतळ प्रवासाचा कालावधी सुमारे ९० मिनिटांवरून ३० मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याचा सिडकोचा दावा आहे.
Most Popular News of this Week
तलावांमधील पाण्याचा...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या...
सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा...
| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... |...
नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४...
... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत...
उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा...
उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची...
भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) –...
