बारवी प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा सर्वसाधारण सभेत गाजला.....
सत्ताधारी भाजप व शिवसेना नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी नवी मुंबई (प्रतिनिधी) – बारवी प्रकल्पग्रस्तांना राजकीय दबावाने थेट नवी मुंबई महापालिकेत नोकरीत सामावून घेण्याचा मुद्दा काल पार पडलेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नवी मुंबई महापालिकेतील नोकऱ्यांच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप व शिवसेना नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची होण्यासह खडाजंगी झाल्याने काही काळ सभागृहाचे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेरीस महापौर सुजाता पाटील यांनी यात मध्यस्थी केल्यानंतर हे वातावरण निवळले. नमुंमपाच्या काल पार पडलेल्या महासभेत झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत काढण्यात आलेले टेंडर रद्द झाल्याबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव भाजपने आणला होता. या प्रस्तावावर बोलतांना भाजप विरुध्द शिवसेना असा सामना महासभेत जोरदार रंगला असल्याचे चित्र पहावयास मिळाले. या चर्चेदरम्यान, नगरसेवक सुरज पाटील यांनी शिवसेनेला डिवचतांना जेव्हा बारवी डॅमची उंची वाढवितांना तेथील प्रकल्पग्रस्त विना कायदा, विना नियमावली व बिंदूनामावली न पाहता प्रशासकीय कार्यकाळात नवी मुंबई महापालिकेत लादल्याचा आरोप यावेळी नगरसेवक सूरज पाटील यांनी केला. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी तुम्ही पोटतिडकीने बोलला असता असता आम्हाला बरे वाटले असते, असा खोचक टोला शिवसेनेला लगावत सुरज पाटील यांनी नगरसेवक शिवराम पाटील यांना लक्ष्य केले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी आक्षेप घेत, भाजप नगरसेवक कुठला विषय कुठे नेत आहेत, देसाईंना गप्प बसविले. बिंदू नामावलीचा हा विषय नाही, ही बाब महापौर सुजाता पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर नगरसेवक सूरज पाटील यांनी मी या विषयावर बोलत आहे, तुम्हाला मिरची लागली का ? असा संतप्त सवाल शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांना उद्देशून केला. झोपडपट्टी व प्रकल्पग्रस्तांचा विषय कुणी काढला अशी विचारणाही सूरज पाटील यांनी यावेळी केली असता, मी हा विषय का काढू शकत नाही, इथले काय झोपले आहेत का ? असा प्रतिसवाल शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांनी सभागृहात केला. यावेळी दोन्ही बाजुंनी एकमेकांवर आरोपाच्या फैऱ्या झडत होत्या. विद्यमान महापालिका सभागृहाआधी प्रशासकीय राजवट कुणाच्या अख्यात्यारीत चालत होती हे दुनियेला माहिती आहे असा संतप्त सवालही नगरसेवक सूरज पाटील यांनी केला. तेव्हा कोणी भांडले असते तर आनंद वाटला असता, त्यावेळी बारवी धरणाचे पाणी सुध्दा नवी मुंबईकरांना मिळाले नाही असा मुद्दाही पाटील यांनी उपस्थित करून तुम्ही कुठल्या हक्काने स्वतःला प्रकल्पग्रस्त सांगता... तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे वक्तव्य सूरज पाटील यांनी सभागृहात करताच, शिवसेना नगरसेवक चांगलेच संतप्त व आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी नगरसेवक व्दारकानाथ भोईर यांनी नगरसेवक सूरज पाटील यांना उद्देशून लाज तुम्हाला वाटली पाहिजे. आमदार कोण आहेत, आम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही काहीही बोलता असा संतप्त सवाल केल्याने सभागृहात दोन्ही बाजुचे वातावरण तप्त झाले होते. यावेळी नगरसेवक सूरज पाटील व व्दारकानाथ भोईर या दोन्ही सदस्यांना महापौर सूजाता पाटील ह्या आसनावर बसून घेण्याची विनंती करतांना दिसत होत्या. मात्र त्यानंतरही दोन्ही बाजुचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नगरसेवक व्दारकानाथ भोईर यांनी तुम्ही पालिकेत २५ वर्षे आहात. आम्ही बोलत नाही.. आम्ही सन्मान करतो... आम्ही कधी अपशब्द वापरला नाही असे नगरसेवक व्दारकानाथ भोईर सांगत, नगरसेवक सूरज पाटील यांनी शब्द मागे घ्यावा अशी मागणी महापौरांकडे केली. यावेळी नगरसेवक सूरज पाटील यांनी आपला शब्द मागे घेतो असे सांगितल्यानंतर सभागृहातील वातावरण काहीसे निवळले.
