एमआयडीसीची उरणमध्ये पाणी बिलाची ७६.९४ कोटींची थकबाकी
उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी बिलाची तब्बल ७६ कोटी ९४ लाख ९३ हजार ९८० रुपयांची अवाढव्य थकबाकी साचली आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्याने एमआयडीसीने कठोर पाऊल उचलत २० पैकी ८ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित केला असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता ज्ञानदेव सोनावणे यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उरण नगरपालिकेकडे सर्वाधिक ४२ कोटी ७५ लाख ५ हजार २३१ रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पाणी बिल, मंजूर कोट्यापेक्षा जास्त वापरलेला दंड आणि विलंब शुल्काचा (उझउ) समावेश आहे.ग्रामपंचायतींच्या बाबतीत सुरू असलेल्या जोडण्यांपैकी १२ ग्रामपंचायतींकडे सुमारे २७.५७ कोटी रुपये थकीत आहेत. खंडित केलेल्या जोडण्या पैकी ८ ग्रामपंचायतींकडे सुमारे ६.६२ कोटी रुपये थकीत आहेत. अशी स्थिती थकबाकीदारांची आहे. प्रमुख थकबाकीदार ग्रामपंचायती (कोटींमध्ये) चाणजे - ११.१९ कोटी, फुंडे - ३.८५ कोटी, जसखार - २.८५ कोटी, चिरले - २.६७ कोटी, धुतुम - १.६९ कोटी, करळ- १.१७ कोटी, थकबाकी न भरल्यामुळे एमआयडीसीने १. दिघोडे, २. दादरपाडा, ३. वेश्वी, ४. पागोटे, ५. चिरनेर, ६. रंजनपाडा, ७. नवघर आणि ८. खोपटा या ८ ग्रामपंचायतींची पाणी जोडणी कापली आहे. अनेक ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही, नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करूनही एमआयडीसीचे बिल भरत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मार्च २०२६ अखेरची ही आकडेवारी प्रशासकीय चिंतेचा विषय बनली आहे.
