खारघरमध्ये डेब्रीज खाली करण्यासाठी आलेल्या डम्परवर कारवाई; एक डंपर जप्त
खारघरमध्ये डेब्रीज खाली करण्यासाठी आलेल्या डम्परवर कारवाई; एक डंपर जप्त
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात येत असलेल्या भूखंडावर बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्या डंपरबरोबर त्यांच्या चालकांना रंगेहाथ पकडून या प्रकारांना आळा घालण्यासाठी सिडको प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. १५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास खारघर से-२० येथील भूखंड क्रं - ८ येथे अनधिकृतपणे डेब्रीज खाली करणाऱ्या एका डंपर्सवर कारवाई करून तो जप्त करण्यासह चालकाविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील राडा रोडा नवी मुंबई परिसरात दिवसा, रात्री तसेच पहाटेच्या सुमारास गुपचूपपणे टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाच प्रकारे राडा रोडा घेऊन एक डंपर खारघर से-२० परिसरात येणार येत असल्याची माहिती सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, आभियांत्रिकी विभाग व पोलिस विभाग यांच्यासह दि. १५ एप्रिल रोजी सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असतांना पहाटे साडेपाचच्या सुमारास एमएच-४६ - बीयू - ७४९४ व डंपर क्रमांक एमएच-४३ - वाय - १७९५ या डम्पर वरील चालक हा त्याच्या ताब्यातील डंपर मधून मानवी जिवितास व लोकांच्या आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रीज हे अनधिकृतपणे आणून खारघर से - २० येथील भूखंड क्र. ८ सी, याठिकाणी सिडको कार्यक्षेत्रात खाली करत असतांना मिळून आला. यावेळी भरारी पथकाने सदरचा डंपर जप्त केला असून याबाबत चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
