Breaking News

भाजी मार्केटमध्ये केडीएमसीची कारवाई; ११४ गाळे सील

भाजी मार्केटमध्ये केडीएमसीची कारवाई; ११४ गाळे सील

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ असलेल्या उर्सेकर वाडी भागातील भाजी मार्केटवर महापालिकेने मोठी आणि अचानक कारवाई केली आहे. या कारवाईत पालिकेने ११४ गाळे सील केले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे गाळे मुळात भाजी मार्केटसाठी देण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी दुकाने थाटून शटर लावण्यात आले होते आणि या जागेचा वापर इतर कामांसाठी केला जात होता. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच पालिकेने कठोर पाऊल उचलत हे सर्व गाळे सील केले आहेत. महापालिकेच्या ग -वॉर्डचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, फ-वॉर्डचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि मालमत्ता कर विभागाच्या संयुक्त पथकाने मधुबन सिनेमासमोरील भाजी मार्केटची पाहणी केली. या पाहणीत मार्केटच्या ओट्यांवर नियमांचे उल्लंघन करून पक्की दुकाने आणि शटर लावल्याचे समोर आले. साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले की, हे मार्केट पालिकेच्या मालकीचे असून ते फक्त भाजी विक्रीसाठी देण्यात आले होते. मात्र, त्या जागी पक्की दुकाने थाटण्यात आली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करत ११४ गाळे सील करण्यात आले आहेत. आता या दुकानांच्या मालकांच्या कराराची तपासणी केली जाईल. जर कोणी हे गाळे बेकायदेशीरपणे भाड्याने दिले असतील किंवा कराराचा भंग केला असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, एफ आणि जी वॉर्डच्या हद्दीत अनधिकृत व्यवसाय आणि पदपथांवरील विक्रेत्यांविरुद्ध संयुक्त मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान भाजी मार्केटचा वापर इतर व्यावसायिक कामांसाठी होत असल्याचे उघड झाले. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


Most Popular News of this Week