ऐरोलीतील नाट्यगृह उभारणीतील शुक्लकाष्ठ संपेना... नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजण्यापूर्वीच लागली आग
ऐरोलीतील नाट्यगृह उभारणीतील शुक्लकाष्ठ संपेना... नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजण्यापूर्वीच लागली आग
ऐरोली (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली से -५ येथे उभारण्यात येणाऱ्या व सुमारे ९० टक्के काम पूर्णत्वास गेलेल्या नाटयगृह वास्तूच्या तळमजला व पहिल्या मजल्यापर्यंत काल अचानक आग लागण्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. दरम्यान, भूमिपुजन झाल्यानंतर आजमितीस जवळपास ११ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही सदरचे हे नाट्यगृह सुरु होवू शकलेले नसतांनाच आता नाटयगृहाला लागलेल्या या आगीमुळे हे नाट्यगृह सुरु होण्यास अजून वेळ लागणार असल्याने झालेल्या एकूणच या घटनेबद्दल माजी लोकप्रतिनिधींसह नाट्यरसिकांकडून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात असून, आगीच्या या घटनेची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणेपासून दिघ्यापर्यंतच्या नागरिकांसाठी मनोरंजनासाठी हक्काचे ठिकाण असावे हा विधायक हेतु डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली से-५ येथील भूखंड क्र ३७ याठिकाणी नाटयगृह उभारणीचे प्रस्तावित करण्यात आले. त्यानुसार वर्ष २०१३ मध्ये महापालिका सर्वसाधारण सभेने या नाटयगृहाच्या कामास प्रशासकीय मंजूरी दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पाडून सुरुवातीला एका कंपनीस वर्ष २०१४ रोजी कंत्राट दिले होते. मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या विविध परिस्थितीमुळे काही वर्षे या नाटयगृहांचे काम रखडले होते. यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाने या नाटयगृहासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली व त्यानुसार जुलै २०२१ पासून या नाटयगृहाच्या कामाची जबाबदारी नव्याने एका कंपनीला दिली. मात्र या नाटयगृह इमारतीचे भूमिपुजन होवून आजमितीस ११ वर्षाहून अधिकचा काळ उलटूनही सध्यस्थितीत ९० टक्के इतकेच काम मार्गी लागलेले असतांनाच काल अचानक या नाटयगृहाच्या इमारतीला आग लागल्याने ऐरोलीतील नाटयगृह उभारणीतील शुक्लकाष्ठ काही केल्या अजूनही संपत नसल्याचे स्पष्ट होत असून, याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास या घटनेची माहिती ऐरोली अग्निशामक दलास मिळताच, ऐरोली अग्निशामक दलाच्या दोन, कोपरखैरणे व रबाळे एमआयडीसी अग्निशामक दलाचे प्रत्येकी एक अशा एकूण ०४ गाड्यांसह अधिकारी व जवानांनी घटनास्थळी पोहचून तातडीने उपाय योजना हाती घेतल्याने, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलास यश आले. सदरची ही आग नाटयगृह वास्तूच्या तळमजला व पहिल्या मजल्यावर लागल्याने याठिकाणच्या लाकूडाने पेट घेतला. आगीच्या घटनेवेळी टेरेसवर असलेल्या दोन कामगारांची ऐरोली अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपरित्या सुटका केली. वेल्डिंग व शॉर्टसर्किटमुळे सदरची ही आग लागली असावी अशी शक्यता अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यावेळी घटनास्थळी उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरूषोत्तम जाधव, विभागीय अधिकारी राजेंद्र सुसविरकर, ऐरोली अग्निशामक दलाचे केंद्र अधिकारी उपेंद्र भोईर, सहाय्यक केंद्र अधिकारी नितीन कांबळे आदींसह अग्निशामक जवान यांनी उपस्थित राहून सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, यापूर्वी मे २०२५ पर्यंत या नाटयगृहाचे काम पूर्ण करण्याबाबतची डेडलाईन संबंधित ठेकेदार कंपनीस महापालिकेकडून देण्यात आली होती. मात्र ही डेडलाईन संपल्यानंतर अजून पावेतो नाटयगृहाचे काम मार्गी लागले नसतांनाच या नाटयगृहाला आग लागल्याची घटना घडल्याने नाटयरसिकांमध्ये तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात बोलतांना ऐरोलीतील नाटय कलाकार सुनील पगार यांनी ऐरोलीकरांसाठी ही दुःखाची बाब असल्याचे सांगितले. एक तप या नाटयगृहाची वास्तू उभी करण्यासाठी लागली. दिवाळीपर्यंत नाटयगृह सुरु होणार असल्याची अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत होती. मात्र तत्पूर्वीच ही घटना घडल्याने कलाकारांसाठी ही मोठी हानी असून झालेल्या या घटनेची चौकशी करण्यासह प्रशासनातील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर ऐरोलीतील या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सुरुवातीपासून पुढाकार घेणारे माजी नगरसेवक मनोहर (एम.के) मढवी यांनी झालेल्या या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहाला लागलेली आग ही दुर्देवी बाब असून, असे व्हायला नको होते. नाट्यगृह सुरु होण्यास विलंब लागला हे सत्य आहे. ऐरोलीतील नाट्यगृहासाठी सतत सभागृहात लढा दिला. सभागृहात त्यासाठी भांडलो. मात्र तत्कालीन ऐरोलीतील एकाही नगरसेवकांनी या विषयाबाबत पाठिंबा दिला नसल्याची खंत व्यक्त करतानाच, ही आग कशामुळे लागली याबाबत कुणाला दोष देण्यापेक्षा या पाठीमागील सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. भविष्यात कोणतेही विकास काम होताना राजकारण न करता काम लवकर व चांगल्या दर्जाच्या कसे होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
