नवी मुंबईत रस्त्यावरील बेकायदा गॅरेजच्या संख्येत वाढ..... बेकायदा गॅरेजस विरोधात कडक उपाययोजना हाती घ्या!
नवी मुंबईत रस्त्यावरील बेकायदा गॅरेजच्या संख्येत वाढ..... बेकायदा गॅरेजस विरोधात कडक उपाययोजना हाती घ्या!
सिडकोचे माजी संचालक नामदेव भगतांची मागणी नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात रस्त्यावर बेकायदापणे वाहने उभी करून चालणाऱ्या गॅरेजच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या बेकायदा गॅरेजसमुळे विविध समस्या निर्माण होतांना दिसत आहे. रस्त्यावरील या बेकायदा गॅरेजमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, शहरातील अशा बेकायदा गॅरेजसवर कारवाई करून बंद करण्यासह भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी सिडकोचे माजी संचालक तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना पाठविलेल्या या निवेदनातून नामदेव भगत यांनी शहरातील बेकायदा गॅरेजसमुळे निर्माण झालेल्या विविध समस्या व मुद्दे उपस्थित केले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विविध भागांमध्ये आजमितीस रस्त्यावरच स्कूटर, मोटरसायकली तसेच चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीची कामे करणारी गॅरेज मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या गॅरेजमुळे विविध गंभीर समस्या निर्माण होत आहेत. यात प्रामुख्याने दुरुस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यावर उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह सतत होणाऱ्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर गर्दी वाढून अपघाताचा धोका निर्माण होत आहे. तसेच दुरूस्तीसाठी येणाऱ्या वाहनांमधील वापरलेले दूषित ऑईल व इतर घातक पदार्थ रस्त्यावरच टाकले जात असल्याने पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. शहराच्या तसेच, काही ठिकाणी संबंधित स्वच्छता व सौंदर्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या विविध बाबी या निवेदनातून नामदेव भगत यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. दरम्यान, शहरातील या बेकायदा गॅरेजव्दारे रस्त्यावर वाहन दुरूस्तीच्या या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने ही बेकायदेशीर गॅरेज वाढत असल्याचा आरोपही नामदेव भगत यांनी या निवेदनातून केला आहे. शहरासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याने महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या सर्व वाहन दुरुस्ती गॅरेजवर तात्काळ कारवाई करून ती बंद करावीत व भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, नवी मुंबईतील वाढती पार्किंगची समस्या सध्या गंभीर रूप धारण करू लागली आहे. या समस्येवर उपाय म्हणून बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प उभारण्याची मागणी करणारे पत्र सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी आयुक्तांना यापूर्वीच सादर केले आहे. रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी, अपघात तसेच नागरिकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने पार्किंच्या समस्या सोडविण्यासाठी त्वरीत उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी काही ठिकाणे सुचविलेली आहेत. यात गोठवली गाव से - ३०, ऐरोली (रेल्वे स्टेशन परिसर), घणसोली स्टेशन व एमआयडीसी परिसर वाशी से - १७, १९ ( मार्केट व कमर्शियल झोन) नेरुळ (एलपी सिग्नल व स्टेशन परिसर), बेलापूर (सीबीडी क्षेत्र) व इतर आदींचा समावेश आहे.
