नवीन पनवेलमध्ये पुनर्विकासविषयक बैठकीत राडा!
अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा आरोप -नवी मुंबई (प्रतिनिधी) – पुनर्विकासावरून वादावादीचे व हाणामारीच्या घटना समोर येत असतांनाच नवीन पनवेल भागात पुनर्विकासासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत, अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांकडून रहिवाशांना मारहाणी झाल्याचे सांगितले जाते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या परिसरात खळबळ उडाली आहे. आता पोलिस नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सिडको कॉलनीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा दिवसेंदिवस सर्वत्र तापतांना दिसत आहे. या कारणावरून वादावादाचे प्रसंग निर्माण होत असतांनाच नवीन पनवेल से- १४ येथील अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी (ए१ / १९) मध्ये पुनर्विकासाच्या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीदरम्यान मोठा गोंधळ आणि हाणामारीची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सदर सोसायटीत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सूरूवातीला पुनर्विकासाच्या अटी आणि प्रक्रियेवरून सभासद आणि व्यवस्थापन समिती यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरु झाला. यानंतर हा वाद वाढत जावून काही वेळातच हा वाद धक्काबुक्कीपर्यंत येवून ठेपला. सोसायटीतील रहिवाशांच्या आरोपानुसार, अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत याने वादाच्या दरम्यान बाहेरील काही तरुणांना सोसायटीत बोलावले व या तरुणांनी बैठक सुरु असतांनाच तेथे घुसून उपस्थित रहिवाशांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हाणामारीत सोसायटीतील दोन रहिवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी रहिवाशांकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महिलांसमोरच कपडे फाटेपर्यंत दोघा भावांना मारहाण - दरम्यान, पुनर्विकासाच्या बैठकीत झालेल्या या हाणामारीत काही तरूणांना कपडे फाटेपर्यंत रक्तबंबाळ करून महिलांसमोरच मारहाण करण्यात आल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. यासंदर्भात मारहाण झालेल्या दोघा भावांपैंकी एका भावाने व्हायरल व्हिडीओमध्ये बोलतांना सांगितले की, पुनर्विकासासंदर्भात सोसायटीत बैठक असतांना अध्यक्ष रविंद्र भगत व त्यांचा मुलगा अजिंक्य भगत यांनी बाहेरून तरूणांना बोलावून मारहाण केली असल्याचे सांगितले. पुनर्विकासात कोट्यावधींचा खेळ झाला असून, या व्यवहारात कमिटीने भ्रष्टाचार केला असल्याचा रहिवाश्यांकडून आरोप केला जात आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
