Breaking News

नवी मुंबई महापालिकेत परिवहनसाठी भाजपच्या १२ सदस्यांची निवड

नवी मुंबई महापालिकेत परिवहनसाठी भाजपच्या १२ सदस्यांची निवड

बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या काल पार पडलेल्या महासभेत १२ परिवहन सदस्यांची नियुती करण्यात आली. या १२ परिवहन सदस्यांमध्ये सर्वच्या सर्व सदस्य भाजपचे आहेत. दरम्यान, परिवहन समितीसाठी भाजपकडून १२ तर शिवसेनेकडून ५ सदस्यांची नावे सुचवण्यात आली होती. मात्र सभागृहातील पक्षीय तौलानीक संख्याबळाऐवजी परिवहन समितीसाठी मतदान प्रक्रियेद्रारे निवड झाल्याने भाजपचे सर्व १२ सदस्य निवडून आले.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २५(२) अन्वये, प्रशासनाचा किंवा परिवहनचा अनुभव असलेल्या तसेच अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय किंवा कामगार विषयक बाबतीत ज्यांची क्षमता दिसून आली असेल तसेच जे पालिका सदस्य असतील वा नसतील अशा व्यक्तींमधून परिवहन समितीवरचे सदस्य म्हणून १२ व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रस्ताव काल पार पडलेल्या महासभेच्या पटलावर घेण्यात आला असल्याचे यासंदर्भात महापालिकेने स्पष्ट केले आहे. निवडण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या १२ परिवहन सदस्यांमध्ये प्रामुख्याने राहुल शिंदे, राजेश हौसला राय, विकास कुंडलिक झंझाड, शितल श्रीपत भोईर, रोशन रामचंद्र पाटील, राजश्री नारायण कातकरी, विनोद तुळशिराम म्हात्रे, यशपाल सिद्राम ओव्हाळ, कुणाल प्रकाश महाडिक, हनुमंत कोंडीबा रोडे, अभिजीत प्रकाश पेडणेकर व तिर्था मारूती सकपाळ यांच्या नावाचा समावेश आहे. निवड झालेल्या उपरोक्त परिवहन सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ.कैलाश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


Most Popular News of this Week