परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे गटात गदारोळ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्यांच्या नियुर्तीवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पहावयास मिळाले. हा वाद चिघळल्यामुळे महापौर सुजाता पाटील यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकुब केले गेले होते. मात्र सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर परिवहन समितीसाठी भाजपकडून १२ तर शिवसेनेकडून ५ सदस्यांची नावे सुचवण्यात आली होती. यात मतदान प्रक्रियेद्वारे भाजपचे सर्व १२ सदस्य निवडून आले. महापौरांनी परिवहन समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करताच विरोधकांनी त्याला तीव्र विरोध दर्शवत घोषणाबाजी सुरू केली. काही नगरसेवकांनी महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी परिवहन समितीच्या या रचनेवर आक्षेप घेत, सदरची ही निवड नियमबाह्य असून, सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर सत्ताधारी भाजपने नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्यात आल्याचे सांगत विरोधकांचे आरोप फेटाळले. हा वाद चिघळल्यामुळे शिवसेनेने याबाबत न्यायालयात जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
