मीरा भाईंदर महापालिकेतर्फे लॉजसह ऑँर्केस्ट्र बारच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
मीरा भाईंदर महापालिकेतर्फे लॉजसह ऑँर्केस्ट्र बारच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
भाईंदर(प्रतिनिधी)- मिरा-भाईंदर महापालिका प्रभाग समिती क्र. ०४ व 0६ कार्यक्षेत्रातील लॉजसह ऑर्केस्ट्र बारच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने तोडक कारवाई करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चांगळाच दणका दिला आहे. महापालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शहर नियोजन व कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेमार्फत सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने, प्रभाग समिती क्रं ०४ आणि प्रभाग समिती क्रं.६ कार्य क्षेत्रातील लॉज अँड बारच्या अनधिकृत बांधकामावर आयुक्तांच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली. शहरातील विविध प्रभागांमध्ये अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे व नियमबाह्य वापरावर कठोर कारवाई करून सार्वजनिक सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण तसेच नागरी सुविधा अबाधित राखण्याबाबत आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागामार्फत नियमित व व्यापक स्वरूपात कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. मिरा भाईंदर महापालिका प्रभाग समिती क्रं.०४ क्षेत्रातील काजल लॉज अंड रूम्स तसेच प्रभाग समिती क्रं 0६ क्षेत्रातील कशीश ऑर्केस्ट्रा बार या अनधिकृत बांधकामावर नुकतीच जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई केली.
सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (अतिक्रमण) डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वप्नील सावंत, सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले, कनिष्ठ अभियंता, फेरीवाला पथक प्रमुख, अतिक्रमण विभाग कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि म.सु.ब. जवान उपस्थित होते.
