Breaking News

उरणच्या सुशोभीकरणासाठी लावलेली नारळाची झाडे जाळली ; निसर्गप्रेमींकडून सिडकोच्या विरोधात संताप

उरणच्या सुशोभीकरणासाठी लावलेली नारळाची झाडे जाळली ; निसर्गप्रेमींकडून सिडकोच्या विरोधात संताप

उरण (वार्ताहर) - उरण द्रोणागिरी नोड येथील रस्ता सुशोभीकरण्यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च करून लावण्यात आलेली नारळाची झाडे सिडकोच्या ठेकेदारांनी जाळून टाकली आहेत. या आगीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खारफुटीच्या झाडांना देखील झळ लागली असून खारफुटीची झाडे होरपळली आहेत. यामुळे सिडकोच्या विरोधात निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. उरण तालुक्‍यातील द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा ( झाडे लावा झाडे जगवा ) या माध्यमातून सिडकोने हाती घेतला आहे. त्या धर्तीवर सिडकोने पागोटे - भेंडखळ - करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण केलेल्या कोस्टल रस्त्यांवर सुमारे एक कोटी रुपये खर्च करून नारळाची चार हजार झाडे लावली आहेत.सदरच्या झाडांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ही सिडकोची असल्याने सिडको दरवर्षी पावसाळ्यानंतर सदर झाडांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन नारळाच्या झाडांची देखभाल करत आहे. मात्र सिडकोच्या दुर्लक्षित पणामुळे या रस्त्याच्या बाजूला काही परप्रांतियांनी बेकायदेशीर टपऱ्या व झोपड्या बांधल्या असून त्यामध्ये अवैध व्यवसाय सुरू केला आहे. त्यातील काही व्यवसायिक व सिडको कडून झाडांचे जतन व संवर्धन करण्याचा ठेका घेणारे ठेकेदार हे झाडा जवळील गवत काढून न टाकता सदर गवत हे जाळून टाकत आहेत.तरी सिडकोने ही झाडे जाळणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी सध्या जनतेतून करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week