रबाळेगाव भुयारी मार्ग बनलायं समस्यांचे आगार... कचऱ्याचे साम्राज्य; अस्वच्छेसह दुर्गंधीने नागरिक त्रस्त
रबाळेगाव भुयारी मार्ग बनलायं समस्यांचे आगार... कचऱ्याचे साम्राज्य; अस्वच्छेसह दुर्गंधीने नागरिक त्रस्त
ऐरोली - बेलापूरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील रबाळेगाव कोळीवाडा भुयारी मार्ग सध्या विविध समस्यांचे आगार बनले आहे.या भुयारी मार्गाच्या प्रवेशव्दारालगतच्या रेल्वेच्या संरक्षक भिंतीजवळ सध्यस्थितीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्याच्या या समस्येमुळे या भुयारी मार्गातून रबाळे गावातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना येथील कचऱ्यातून निर्माण झालेल्या अस्वच्छतेसह दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. रबाळेगाव भुयारी मार्गाच्या प्रवेशव्दारालगत असलेल्या रेल्वेच्या संरक्षक भिंतीजवळील मोकळ्या जागेत काही नागरिकांकडून कचरा टाकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्यासह खाद्यपदार्थ टाकले जात असल्याने भूयारी मार्गात प्रवेश करताच नागरिकांचे कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या दुर्गधीमुळे डोके भणभणायला लागते. याठिकाणी जमा होणारा कचरा महापालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांकडून उचण्याचे काम केले जात असले तरी स्वच्छतेबाबतची बेफिकीरी वृत्ती असलेल्या काही नागरिकांकडून याठिकाणच्या उघड्या जागेवर वारंवार कचरा फेकण्याचे प्रकार होतांना दिसत आहेत. एकंदरीत या समस्येमुळे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीही हैरान झाले असून, भूयारी मार्गालहगत कचरा टाकण्याचे हे प्रकार थोपविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेषकरून महापालिकेने पुढाकार घेवून या जागेच्या ठिकाणी उंच स्वरूपाची संरक्षंक जाळी बसवावी अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. नवी मुंबई महापालिकेकडून सातत्याने स्वच्छतेचा दिंडोरा पिटाळला जातो. मात्र रबाळेगाव भूयारी मार्गालगत निर्माण झालेल्या या समस्येमुळे अस्वच्छता पसरण्यासह प्रवेशव्दाराचे सौदर्यही धोक्यात आले आहे. एकंदरीत ही समस्या लक्षात घेता, प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन ही समस्या दूर करण्यासाठी उपाय योजना हाती घ्याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, रबाळेगाव व रबाळे झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्वाच्या असलेल्या या भूयारी मार्गाच्या प्रवेशव्दारावरील पायऱ्या निखळल्या आहेत. तसेच प्रवेशव्दाराबाहेर पथदिव्यांची सोय नसल्याने रात्रीच्या सुमारास येथे कायम अंधाराचे साम्राज्य असते. या प्रकाराचा महिला वर्गास मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे निखळल्या पायऱ्यावरून नागरिक घसरून अपघाती घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशी एकंदरीत परिस्थिती असतानाही या प्रकाराकडे संबंधित प्रशासनासह लोकप्रतिनिधी व स्वत:ला समाजसेवक संबोधणाऱ्या अशा सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
भिकाऱ्यांचा व फेरीवाल्यांचा वावर...
या भुयारी मार्गात भिकाऱ्यांच्या वाढत्या वास्तव्यामुळे येथे अस्वच्छता व दुर्गंधी पसरत आहे. तसेच भूयारी मार्गातच परप्रांतीय फेरीवाला मागील अनेक वर्षापासून ठाण मांडून व्यवसाय करत असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना या गोष्टीचाही त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाहीतर रात्रीच्या सुमारास भूयारी मार्गालहगतच वाहनातून फळविक्री करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून होत असल्याने कचऱ्यांची समस्या निर्माण होण्यास अधिक मदत मिळते. या सर्व समस्यांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
