Breaking News

नवी मुंबईतील दिग्गजांना घराणेशाहीचा फटका!

नवी मुंबईतील दिग्गजांना घराणेशाहीचा फटका!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - एकेकाळी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आली की, ना.गणेश नाईक कुटूंबावर घराणेशाहीच्या मुद्यावर विरोधी मंडळी तुटून पडायची. पुढे विधानसभेच्या दोन्ही जागा लढवतांना नाईक कुटूंबास नेहमीच या आरोपांना सामोरे जावे लागायचे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीच्या वेळी गणेश नाईक यांच्या पक्षातील घराणेशाहीपेक्षा विरोधी पक्षातच अधिक घराणेशाही बघायला मिळाली. भाजप विरूध्द शिंदे सेना अशी लढत झालेल्या नवी मुंबई मनपाच्या या निवडणूकीत अनेक दिग्गज उमेदवारांना घराणेशाहीचा फटका बसला. एकापेक्षा जास्त जागा कुटूंबासाठी मागितल्याने या जागा लढतांना काहींना यापैकी एक- दोन तर काहींना सर्वच्या सर्वच जागा गमवाव्या लागल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे एम.के.मढवी, सोमनाथ वास्कर, भाजपचे अनंत सुतार, नामदेव भगत, नवीन गवते, या दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, संदीप म्हात्रे, चंद्रकांत पाटील, रंगनाथ औटी या दिगज माजी नगरसेवकांना आपल्या कुटूंबातील एक-एक जागा गमवावी लागली. या निवडणूकीत तुर्भ येथील चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला. मात्र त्यांची पत्नी कविता पाटील निवडणूकीत जिंकल्या आहेत. जुईनगर येथील रंगनाथ औटी यांचा निवडणूकीत पराभव झाला तर त्यांची पत्नी शशिकला औटी ह्या विजयी झाल्या. कोपरखैरण्यातील संदीप म्हात्रे हे विजयी झाले असले तरी त्यांची पत्नी संगिता म्हात्रे यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला आहे. तुर्भे येथे शिवसेनेचे सुरेश कुलकर्णी हे आपल्या सुनेसह विजयी झाले असून त्यांचा मुलगा महेश कुलकर्णी पराभूत झाला आहे. तर कौपरखैरण्यात शिवराम पाटील व अनिता पाटील या दांपत्याने निवडणूकीत विजयी संपादन केला असला तरी त्यांची सूनबाई निवडणूकीत पराभूत झाली आहे. प्रभाग क्रं.९ मधून शिवसेनेचे प्रशांत पाटील हे विजयी झाले असले तरी त्यांची पत्नी सुवर्णा पाटील यांचा निवडणूकीत पराभव झाला.


दरम्यान, गत वेळच्या निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या प्रस्थापित नगरसेवकांच्या कुटूंबात दोन ते तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अशा प्रस्थापितांना या निवडणूकीत धक्का बसला आहे. यात प्रामुख्याने माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार यांच्यासह त्यांची पत्नी शशिकला सुतार यांना पराभव सहन करावा लागला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के.मढवी यांच्यासह त्यांची पत्नी विनया मढवी व सुन तेजश्री मढवी अशा एकाच कुटूंबातील तिघांना पराभवाचा सामना सहन करावा लागला आहे. तसेच दिघ्यातून नवीन गवते यांच्या कुटूंबातून त्यांची पत्नी अँड. अपर्णा गवते व भावजय दीपा गवते अशा तिघांचा पराभव झाला आहे. तसेच सानपाडयातून सोमनाथ वास्कर यांच्यासह पत्नी कोमल वास्कर व कुटूंबातील सदस्य असलेल्या नेहा वास्कर अशा तिघांचा पराभव झाला आहे. तर नेरुळमध्ये नामदेव भगत यांच्यासह त्यांची पत्नी इंदुमती भगत अशा दिग्गज माजी नगरसेवकांना फटका बसला आहे.तर काँग्रेसचे प्रभाग क्रं.२५ मधील बलाढ्य उमेदवार व माजी नगरसेवक संतोश शेट्टी यांनाही पराभवाचा सामना सहन करावा लागला आहे. नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या पत्नी सीबीडीतून पराभूत झाल्या आहेत.

दरम्यान, या निवडणूकीत घराणेशाहीवरून काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असला तरी काही ठिकाण प्रस्थापित आपले अस्तित्व कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले स्वत:सह मुलगी चांदणी चौगुले, मुलगे ममित चौगुले व शुभम चौगुले असे एकाच कुटूंबातील चार जण विजयी झाले आहेत. तर या निवडणूकीत नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनावणे व त्यांची पत्नी रंजनाताई सोनावणे यांच्यासह शिवराम पाटील व त्यांची पत्नी अनिता पाटील, सूरज पाटील व त्यांची पत्नी सुजाता पाटील, रविकांत पाटील व त्यांची पत्नी भारती पाटील ह्या दांपत्याच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. तर शिंदेसेनेच्या उमेदवार हेमांगिनी सोनावणे यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या सोनावणे, वाशीमध्ये प्रणाली लाड व त्यांची मुलगी सोनवी लाड तर माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे व त्यांचा मुलगा अनिकेत म्हात्रे हे या निवडणूकीत विजयी झाले आहेत. वाशीतून विजयी झालेल्या सोनवी लाड ह्या माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्या कन्या असून महापालिका सभागृहात त्या सर्वात तरुण महिला नगरसेविका आहेत.


Most Popular News of this Week