महापालिका निवडणूक मुक्त, पारदर्शी होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे!
महापालिका निवडणूक मुक्त, पारदर्शी होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे!
मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे यांच्या सुचना
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूका भयमुक्त, निष्पक्ष व शांततेत होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे यांनी काल दिल्या. पनवेल महापालिका निवडणूकीसंदर्भात काल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्व संबधित विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक मनिषा कुंभार, निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे, आयकर कर शुल्क विभागाचे सह आयुक्त डॉ. अमित मुंडे (आयआरएस), पोलिस उपायुक्त परिमंडळ २ प्रशांत मोहिते, पोलिस आयुक्त वाहतूक तिरूपती काकडे, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे यांनी पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पुर्ण झाला असून योग्य पध्दतीने सगळी तयारी झाली आहे. तरीही ऐनवेळी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व तयारीची उजळणी करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकित सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आगामी मतदानाच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेली प्रक्रिया, तयारी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती सांगितली. तसेच आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पोलिस विभाग तसेच पोलिस आयुक्तांनी एसएसटी, व्हीएसटी, भरारी पथक अशा सर्व पथकांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली. वाहनांना परवानगी देण्यासाठी पथकांची नियुत्ती करण्यात आली असून या पथकांमध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश असून यांच्या माध्यमातून प्रचार फेऱ्या, रॅली यामधील वाहनांना परवानगी दिली जात असल्याची माहिती वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडणूक विषयक तयारी बाबत माहिती दिली. या बैठकीची प्रस्तावना निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी केले तर समारोप अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त विक्रम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भानुदास फणसेकर, वायएस लोळे, बी.एस चोखवे, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिकेचे सर्व उपायुक्त तथा नोडल अधिकारी, राज्य विद्युत महामंडळाचे बकुल मानवतकर, सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअभियंता मिलींद कदम, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, सर्व पोलिस स्थानकांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
विविध गुन्हयांत १२ लाखांचा मुद्देमाल जप्त...
आजपर्यत विविध गुन्ह्यांमध्ये १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबधितांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच रात्रीची गस्त बसेसची तपासणी, रल्वेची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
