Breaking News

आ-मंदा म्हात्रे यांची नाराजी दूर होईल!

आ-मंदा म्हात्रे यांची नाराजी दूर होईल!

माजी खा.संजीव नाईक यांचा विश्वास

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तिकीट वाटपात आपल्या १३ सक्रिय कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप मंत्री गणेश नाईक, निवडणूक प्रभारी संजीव नाईक यांच्यावर करणाऱ्या आ-मंदा म्हात्रे यांची नाराजी आपण स्वत: भेटून दूर करू तसेच जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या संदर्भातील आरोप सुध्दा गैरसमजूतीमधून करण्यात आले असून, डॉ.राजेश पाटील हे चुकीचे काही करणार नाहीत. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि नेतृत्वाच्या आदेशाचा सन्मान करूनच ते निर्णय घेतात अशी भूमिका मांडत माजी खासदार व नवी मुंबई मनपा भाजपचे निवडणूक प्रमुख संजीव नाईक यांनी अप्रत्यक्षपणे आ.म्हात्रे यांनी केलेळे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले.

नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तिकीट वाटपात आपल्या १३ सक्रिय कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप आ.मंदा म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना करतांनाच, गणेश नाईक यांनी १११ नगरसेवक निवडून आणून दाखवावेत, असे आवाहन त्यांनी दिले. याबाबत प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडतांना माजी खा. संजीव नाईक पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची नवी मुंबईत युती व्हावी याबाबत आग्रही होते. मात्र नवी मुंबईत युती झाली नाही याचे दु:ख वाटते. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये व आमच्या नगरसेवकांना उमेदवारी मिळावी अशी आमची शिवसेनेकडे मागणी होती. दोन चार मुद्यांवर अडचणीबाबत सांगितले होते. काल पर्यंत शहराध्यक्ष संपर्कात होते. नेतृत्वापुढे आम्ही नव्हतो. कार्यकर्त्यांवर अन्याय नको म्हणून शेवटी नाईलाजास्तव आम्हाला एकटे लढण्याचा निर्णय घ्यावा लागला.

भाजपचे निर्णय हे सामुहिक निर्णय असतात. तिकीट प्रक्रिया कशी असते हे मंदाताईंना सुध्दा माहिती आहे. त्या या प्रक्रियातून गेल्या असून, आमच्या त्या नेत्या आहेत. उमेदवारी देण्याचा निर्णय हा सामुहिक असतो, असे सांगतानाच निवडणूक प्रमुख म्हणून माझी जबाबदारी म्हणून त्यांची भेट घेईन असे सांगितले. भाजपचे पारडे जड आहे. १११ हे तुल्यबळ निवडणूकीतील शिलेदार आहेत. तरीही आ.मंदाताईंची भेट घेवून त्यांची नाराजी दूर करू असा विश्वास व्यक्त केला. सर्व फार्म तपासण्यात आले होते. ए आणि बी फार्म देतांना कुठल्याही स्वरूपाची गडबड झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तरीसुध्दा मंदाताईना भेटून त्यांचे गैरसमज दूर करू. साडेनवशे लोकांनी फार्म भरले होते. मात्र १११ उमेदवारांना उमेदवारी मिळाल्याने इतर लोकांवर अन्याय नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


आ.मंदा म्हात्रेंनी केलेळे आरोप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटलांनी फेटाळले

दरम्यान, उमेदवारी वाटपावरून नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्यावरही आ.मंदा म्हात्रे यांनी गंभीर आरोप केले आहेत.त्यांचे हे सर्व आरोप डॉ. पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना फेटाळून लावले. ते म्हणाले की, त्यांनी सुचविलेली नावे मुख्य निवडणूक प्रमुख रविंद्र चव्हाण आणि निवडणू प्रभारी डॉ.संजीव नाईक यांच्या यादीत नव्हती. माझ्याकडे वरिष्ठांकडून आलेल्या यादीनुसार मी एबी फार्म भरू शकलो. ज्यांची नावे नव्हती,त्यांचे एबी फार्म भरू शकलो नाही.आ. मंदा म्हात्रेंनी सुचविलेली नावे ही त्या यादीत नसल्याने त्यांच्याकडे दिलेले एबी फार्मवर मी सही करू शकलो नाही असे सांगतानाच, गैरसमजूतीने हा विषय समोर आल्याचे पाटील यांनी सांगितले.


Most Popular News of this Week