Breaking News

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क, परिवहन व वाहतूक विभागाची बैठक : आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क, परिवहन व वाहतूक विभागाची बैठक : आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना

 पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी आज दिनांक २६ डिसेंबर महापालिका मुख्यालयात उत्पादन शुल्क, परिवहन विभाग व वाहतूक विभागाची बैठक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकित तीनही विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 आदर्श आचारसंहिताचे पालन करताना निवडणूक रॅली, प्रचार मिरवणुकीदरम्यान वाहनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याविषयीच्या सूचना परिवहन विभागास देण्यात आल्या. प्रचार रॅलीचे मार्गाविषयी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती करून घेणे, वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, तपासणी नाक्यावरती संशयास्पद वाहनांची असून चौकशी करण्याबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या.

 उत्पादन शुल्क विभागास भरारी पथकांच्या साह्याने चेकपोस्ट नाक्यांवरती बनावट दारू, अवैध वस्तू  यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पथकांच्या साह्याने आदर्श आचारसंहिताचे पालन  करताना विविध तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याविषयी सूचना दिल्या. तसेच प्रभाग निहाय भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

 पोलीस वाहतूक विभागास सूचना देताना सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाजवळील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून वाहतूक कोंडी होणार नाही यादृष्टीने बॅरिकेटिंग करणे, पार्किंगचे नियोजन करण्याविषयक सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांना एकमेकांच्या संपर्कात राहून नियोजनपूर्वक काम करण्याविषयी सांगितले. 

 एक खिडकी योजनेबाबत माहिती देताना शासनाच्या संबंधित विभागाच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या. निवडणूकविषयक सर्व कामे जसे की सर्व प्रकारची माहिती, परवाना देणे, प्रमाणपत्र तात्काळ एक खिडकीच्या माध्यमातून देण्याविषयीच्या सूचना या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी यावेळी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या.


Most Popular News of this Week