Breaking News

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहिता कालावधीत सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांच्या निवडणूकविषयक आढावा बैठकीप्रसंगी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, निवडणूक विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे आणि इतर विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

काल १५ डिसेंबर रोजी सायंकाळपासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अनाधिकृत बॅनर्स विरोधात धडक मोहीम हती घेण्यात आली असून महापालिकेच्या मालमत्तांवरील उद्घाटन - भूमिपूजनाच्या कोनशिला तसेच राजकीय व्यक्तींची नावे असलेले फलक झाकून घेण्यात येत आहेत. सदर कार्यवाही ४८ तासात काटेकोरपणे पूर्ण करावी व तशाप्रकारचा अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

निवडणूक ३० दिवसांनी असल्याने या कालावधीत निवडणूकीच्या कामाला संपूर्ण प्राधान्य द्यावे असे निर्देशित करतांनाच मतदान केंद्रांच्या जागांची पुनर्पाहणी करावी असे सूचित करण्यात आले. मतदान केंद्रांवर पुरविण्याच्या सुविधांकडेही बारकाईने लक्ष द्यावे व सर्व मतदान केंद्रांचे जिओ टॅगींग करुन घ्यावे म्हणजे त्याचा उपयोग नागरिकांसह सर्वांनाच होईल अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

डिस्ट्रिक इलेक्शन प्लॅन सारखा वॉर्ड इलेक्शन प्लॅन तयार करावा जेणेकरुन त्यातील टेम्प्लेटनुसार प्रत्येक बाबनिहाय कार्यवाही करणे व ती पूर्ण झाल्याची खात्री करणे सोयीचे ठरेल असे सूचित करतांनाच आयुक्तांनी दुबार मतदार यादीची पाहणी करण्याचे काम जलद व अचूक पूर्ण करावे असे निर्देश दिले. निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन, मतदान केंद्रावरील सुविधा तसेच मतदार यादी या बाबींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करतांनाच आयुक्तांनी प्रत्येक विभाग अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी यांच्याशी समन्वय राखावा आणि निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्याकडे लक्ष द्यावे असे निर्देश दिले. निवडणूकीच्या अनुषंगाने संबधित इतर प्राधिकरणांचे अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे नियोजन करण्यात आले असून राजकीय पक्ष प्रतिनिधी व प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्याशीही आयुक्त डॉ. कैलास शिंदे संवाद साधणार आहेत.


Most Popular News of this Week