कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका...
जप्त केलेल्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर
पनवेल (वार्ताहर) - कर्णकर्कश आवाजात दुचाकी पळवून नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकीस्वाराना पनवेल शहर पोलिसांनी चांगला धडा शिकवला. यावेळी दहा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून जप्त केलेले सायलेन्सर रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले. पनवेल शहरातील वडाळे तलाव याठिकाणी अनेक नागरिक, महिला विरंगुळ्यासाठी येतात. मात्र याठिकाणी अनेक दुचाकी स्वार मॉडिफाइड सायलेन्सर लावून सकाळ- संध्याकाळी वेगाने गाड्या पळवतात आणि सायलेन्सरचा फटका आवाज काढत दुचाकी पळवतात. याबाबतच्या अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने दि.११ डिसेंबर रोजी वडाळे तलाव परिसरात मोहीम राबवली. यावेळी दहा दुचाकीस्वारांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच गाड्यांचे सायलेन्सर काढून ते रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.
