नवी मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार!
शिवसेना नेते अंकूश कदम यांचा निर्धार
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत शिवसेनेचा झंझावात सुरु झाला असून ही खरी शिवसेना आहे. येत्या कालावधीत आम्ही आमचे ध्येय गाठल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करतांनाच नवी मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार शिवसेनेचे नवी मुंबईतील नेते अंकूश कदम यांनी नुकताच प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना व्यक्त केला. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली असून त्यास शिवसेना (शिंदे गट)ही अपवाद नाही. त्यानुसार शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त करतांना ते बोलत होते.
अंकूश कदम पुढे म्हणाले की, नवी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वसामान्य लोकांमधून त्यांचा प्रवास झाला आहे. संपूर्ण नवी मुंबईकरांना हक्काचा माणूस म्हणून कोण वाटत असेल तर ते एकनाथ शिंदे हे आहेत. नवी मुंबई व्यतिरिक्त त्यांचा चाहता वर्ग अन्यत्र इतर कुठेच नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. आजमितीस शिवसेनेचे प्रत्येक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते आदी सर्वांनी निवडणूकीत चांगले सुयश प्राप्त करण्यासाठी जबाबदारी घेतली आहे. तसेच जबाबदारी वाटून काम केले जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नवी मुंबईत शिवसेनेचा झंझावात सुरु झाला असून ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीत आम्ही आमचे ध्येय गाठल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक काशिनाथ पवार, विजय माने, दिलीप घोडेकर व इतर आदी पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
