Breaking News

7 हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025’ यशस्वी

7 हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025’ यशस्वी


नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली 32 कि.मी. हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण

 

  नवी मुंबई - स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा जागर करीत 7 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित 'स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025' हा उपक्रम यशस्वी केला. सकाळी ठीक 4.30 वा सुरू झालेल्या हाफ मॅरेथॉनमधील सर्वाधिक 32 किमी. अंतराच्या मुख्य गटात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: धावपटू म्हणून सहभागी होत नागरिकांसमवेत स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत ही हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.

          5, 10, 21 आणि 32 किमी अंतराच्या वेगवेगळ्या गटांमध्ये लेट्स सेलिब्रेट फिटनेस यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये विविध  वयोगटातील स्त्री-पुरुष उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये युवकांची संख्या लक्षणीय होती.

          सकाळी 4.30 वा. या हाफ मॅरेथॉन मधील 32 किलोमीटर अंतराच्या गटाला सुरूवात होऊनही इतक्या पहाटे मोठ्या संख्येने आणि उत्साहाने धावपटू उपस्थित होते. नागरिकांनी उत्साही व उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉ़न उपक्रम यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी  दिव्यांगांनीही सहभागी होत प्रेरणादायी उपस्थिती दर्शविली याचा विशेष उल्लेख केला. 

          स्वच्छ व पर्यावरणशील शहर ही नवी मुंबईची ओळख असून आरोग्यपूर्ण शहराचे ध्येय  नजरेसमोर ठेवून आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल नागरिकांचे तसेच हाफ मॅरेथॉन आयोजनात सहयोग देणा-या लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि नवी मुंबई गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिल व गुरुद्वारा श्री दशमेश दरबार आणि इतर सहयोगी संस्थांचे आयुक्तांनी आभार मानले.

          याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री किसनराव पलांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे, परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 चे उपायुक्त श्री. संजय शिंदे, मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे - पाटील, कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाडे व श्री राजेश पवार, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, बेलापूरचे विभाग अधिकारी श्री. प्रशांत नेरकर, उपअभियंता श्री.गजानन पुरी, उप स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. माजी खासदार श्री.संजीव नाईक यांनीही याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख श्रीम. रिचा समित व नवी मुंबई गुरुव्दारा सुप्रीम कौन्सिलचे पदाधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week