आर्थिक लोकशाही म्हणजे संधीची समानता!
नवी मुंबई महापालिका आयोजित विचारवेध” व्याख्यानप्रसंगी अर्थतज्ज्ञ डॉ.अजित रानडे यांचे मत
बेलापूर (वार्ताहर)- लोकशाही म्हणजे जीवन जगण्याची पध्दत असून आर्थिक लोकशाही म्हणजे संधींची समानता असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.अजित रानडे यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली येथे महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला विचारवेध या व्याख्यानशुंखलेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर” या विषयावरील व्याख्यानात अर्थतज्ज्ञ, लेखक डॉ.अजित रानडे हे बोलत होते. यावेळी डॉ. रानडे यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या शैक्षणिक सुधारणा, जमीन सुधारणा, कामगारांचे हक्क व सामाजिक सुरक्षा या महत्वाच्या पैलूंवर विविध उदाहरणे देत अभ्यासपूर्ण भाष्य केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, स्मारकाच्या सल्लागार संध्या अंबादे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेब म्हणजे प्रचंड ज्ञानाचा नायगरा धबधबा अशी सुरूवात करीत डॉ.अजित रानडे यांनी बाबासाहेबांचे विचार हे आजच्या काळातही सुसंगत असल्याचे जाणवते असे सांगत आपल्या दैनंदिन जीवनात त्याची अंमलबजावणी कशी करावी याचा विचार प्रत्येकाने करावा असे आवाहन केले. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, स्त्रियांना समान सामाजिक व आर्थिक संधी मिळतील, कोणत्याही स्तरावरील व्यक्तीस सारखेच अधिकार असतील, संपत्ती एकवटीकरणावर अंकुश असेल अशा बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या भारताचे चित्र डॉ.अजित रानडे यांनी व्याख्यानातून मांडले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना समाजाला विचारच प्रगतीकडे नेतात, त्यामुळे विचारवेध" व्याख्यानशुंखलेत मान्यवर विचारवंताना निमंत्रित करून नवी मुंबई महापालिका विचारांची देवाणघेवाण सक्षम करण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. स्मारकाच्या ठिकाणी असलेल्या ग्रंथालय व इतर सुविधांतून तसेच मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार€ या पदविका अभ्यासक्रमातून समाज प्रबोधनासाठी व समाज उन्नतीसाठी स्मारकाचा उपयोग व्हावा ही महापालिकेची भूमिका असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या विचारवेध' या सातत्याने सुरू असलेल्या व्याख्यान शृंखलेमध्ये आजच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला आयोजित व्याख्यानालाही रसिकांची भरगच्च उपस्थिती होती.
