खारघर नोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा
नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागामार्फत नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईची मोहिम सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र करण्यात आली आहे. काल सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत खारघर नोड से-११ येथील भूखंड क्र. ८० व ८१ येथे निष्कासन मोहिम राबवून सिडकोच्या जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ २८०० चौ.मी. जागेवरील अनधिकृत बांधकामाचे 0२ बांबूशेड गोडाउन, 0२ झोपड्या ,०१ गॅरेज, 0१ कार वॉशिंग सेंटर इत्यादी तसेच खारघर नोड येथे भूखंड क्र.६३ ए व ६३ बी, सेक्टर ३० येथे निष्कासन मोहिम राबवून सिडकोच्या जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ ५५०० चौ. मी. जागेवरील अनधिकृत बांधकामाचे ४९ कच्च्या बांबूशेडचे स्टॉल्स जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित केले. कारवाई केलेली सदरचे अतिक्रमण सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्यामुळे ती निष्कासित केल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे ही मोहिम राबविण्यात आली. तसेच या कारवाईसाठी १० लेबर, 0१ ट्रक़ , ०२ जीप असा लवाजमा तैंनात ठेवण्यात आला होता.
