केडीएमसी मालमत्ता करा विरोधात संघर्ष समिती आक्रमक...
महानगरपालिका सुविधा देत नसल्याने आम्ही टॅक्स का भरायचा; समिती निर्णयावर ठाम
कल्याण (वार्ताहर) - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये केडीएमसीच्या वतीने मालमत्ता कर वसुली मोहिम तीव्र केली असून केडीएमसीच्या या मालमत्ता करा विरोधात सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. महापालिका सुविधा देत नसल्याने आम्ही टॅक्स का भरायचा असे स्पष्ट करत टॅक्स न भरण्याच्या निर्णयावर समिती ठाम असल्याचे काल पुन्हा अधोरेखित करण्यात आले.
डोंबिवली जवळील देसले पाड्यात बंद असलेल्या इमारतीला साडेचार लाख मालमत्ता कर आकारला असून सदनिका सील करण्यासाठी पालिका येत असून नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याने केडीएमसीच्या या कारभाराविरोधात नागरिकांनी संताप केला आहे. याबाबत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी सांगितले कि, कल्याण डोंबिवली महापालिका एक दरोडेखोर महापालिका आहे. ज्या इमारती बंद आहेत त्यांना चार साडेचार लाख कर लावून जबरदस्ती कर वसुलीसाठी पालिका कर्मचारी येतात. कर न भरल्यास सदनिका सील करण्याची धमकी नागरिकांना देण्यात येते. ग्रामपंचायत असतांना येथील नागरिकांना पाणी होते. पण जशी ही गावे महापालिकेत गेली तसे येथील पाणी बंद झाले. पाणी नसल्याने येथील नागरिक खदानीत कपडे धुवायला जात होते. अशावेळी वर्ष २०२२ साली दुर्घटना घडल्याने देसले पाडा येथील पोलिस पाटील सुरेश पाटील यांच्या घरातील ५ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. याला जवाबदार केडीएमसी असून, जर तुम्ही सुविधा देत नाहीत तर कर घेण्याचा अधिकार नाही, असा सज़्ड इशाराही म्हात्रे यांनी दिला. ज्या कनेक्शनलं पाणीच नाही त्या कनेक्शनचं बिल देखील पालिका वसूल करत असल्याने पठाणी पद्धतीने केडीएमसीची वसुली चालू आहे. या सर्व कारभारा विरोधात संघर्ष समिती नागरिकांसोबत ठाम उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
