नव्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या पद्धतीचा निषेध... कल्याणात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
नव्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या पद्धतीचा निषेध... कल्याणात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
कल्याण (वार्ताहर) - कल्याण डोंबिवलीमध्ये कांग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सचिन पोटे यांच्यासह अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशांचे पालन करत आम्ही हे राजीनामा दिले असले तरी जिल्हाध्यक्ष बदलताना पाळली जाणारी परंपरा मोडण्यात आली. आणि यामुळेच असंतोष उफाळून आल्याचे सांगत सचिन पोटे समर्थकांनी काँग्रेस नेतृत्वावर संताप व्यक्त केला आहे. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष लिओ मेक्कनरॉय, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान, कल्याण पश्चिम ब्लॉक अध्यक्ष प्रवीण साळवे, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष मनिषा सरजीने, डोंबिवली पूर्व ब्लॉक अध्यक्ष संकेत लोके, काँग्रेस कार्यकर्ता हेमराज डेरे आदींसह इतर पदाधिकारी यांचा समावेश आहे. नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या राजाभाऊ पातकर यांच्याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला आहे. पातकर यांनी २०१४ साली कांग्रेसचे उमेदवार असलेल्या सचिन पोटे यांच्या विरोधात बंड करून भाजपात प्रवेश केला होता. आणि १० वर्षे भाजपात राहून प्रचारही केला. भाजपच्या सत्ताकाळातही साधे वॉर्ड अध्यक्षपद न मिळालेल्या व्यक्तीला अचानक कॉंग्रेसमध्ये घेऊन जिल्हाध्यक्षपद देणे हा निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
