शिरवणेतील अनधिकृत झोपड्यांवर सिडकोची धडक कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोतर्फे नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली असल्याने अनधिकृत बांधकाम धारकांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत काल दि.२५ नोव्हेंबर २०२५ रोजी निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित जागेवरील मौजे शिरवणे सर्वे नंबर २१७, २१८, ३२३- येथे तात्पुरत्या स्वरूपाचे पत्रा व वीटबांधकामे असलेल्या ४0 पेक्षा अधिक अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या. या कारवाईतून अंदाजे २००० चौ.मी जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविल्याने हा परिसर आता मोकळा श्वास घेवू लागला आहे. कारवाई केलेले उपरोक्त अतिक्रमण सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आले असल्यामुळे निष्कासित करण्यात आले असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे कारवाईची ही मोहिम राबविण्यात आली. या कारवाईसाठी १ जेसीबी १ पोकलेन १० कामगार, ३ जीप, १ टेम्पो ट्रेंहलर असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.
