सिडकोतर्फे वाशीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
वाशी (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली असून काल वाशी नोडमधील अनधिकृत बांधकामांसह ताडपत्री शेड गॅरेज, कंटेनर यांच्यावर कारवाई करण्यात आली. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत, सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागामार्फत काल सोमवार दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशी नोड येथे निष्कासन मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सिडको संपदीत जागेवरील वाशी से- १९ येथील भूखंड क्र ५० व ५२ मौजे वाशी येथील अंदाजे इमारतीचे क्षेत्र ४००० चौमी अनधिकृत बांधकाम १० ते १२ ताडपत्री शेड गॅरेज,कंटेनर ,पार्किंग ट्रक जेसीबी व टोईंग गाडीच्या सहाय्याने निष्काषित करण्यात आले. कारवाई केलेले नमूद अतिक्रमण सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आले असल्यामुळे ते निष्कासित करण्यात आल्याचे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व नियंत्रक अनधिकृत बांधकामे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे ही मोहिम राबविण्यात आली. या कारवाईसाठी १ जेसीबी १ टोईंग गाडी, १० कामगार, ५ जीप असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.
