Breaking News

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1.40 लाख दंडात्मक वसूली व 46.5 किलो प्लास्टिक जप्त

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1.40 लाख दंडात्मक वसूली व 46.5 किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई - प्लास्टिकमुळे पर्यावरणाला व मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुकाने व व्यवसायाच्या ठिकाणी प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबवून तपासणी  करण्यात येत आहे. तपासणीमध्ये प्लास्टिक पिशव्या अथवा एकल वापर प्लास्टिक वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

या अंतर्गत ऑक्टोबर महिन्यात 5 दुकाने, आस्थापनांवर कारवाई करित रु.25 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून 6.700 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

या तपासणी मोहीमेंतर्गत नोव्हेंबर महिन्यातही 23 नोव्हेंबर पर्यंत 28 दुकाने, आस्थापना या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकचा उपयोग केला जात असल्याचे आढळल्याने एकूण 1 लक्ष 40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच 46 किलो 600 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

यामध्ये परिमंडळ 1 व परिमंडळ 2 च्या भरारी पथकांनी विशेष कामगिरी केली असून प्रत्येकी 5 व्यावसायिकांवर कारवाई करीत प्रत्येकी 25 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. तसेच परिमंडळ 1 च्या भरारी पथकाने 5 किलो व परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने 8 किलो प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे.

ऐरोली विभाग कार्यालयातील प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकानेही 6 व्यावसायिकांकडून रु.30 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे व 8 किलो 250 ग्रॅम प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे. इतर विभागांमध्येही चांगली कामगिरी झाली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संजय शिंदे यांच्या माध्यमातून आठही विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त यांचे अधिनस्त प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथके तसेच दोन्ही परिमंडळाची भरारी पथके प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांसाठी सतत कार्यरत आहेत.

            तरी प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हूनच प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व कापडी /कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत व प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. 


Most Popular News of this Week